प्रिय विद्यार्थी तसेच सुजाण जागरूक पालकांच्या सेवेत महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठी भाषिक मराठी माध्यमांत शिक्षण घेणाऱ्या इय्यता दहावी मराठी व सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास मार्गदर्शनासाठी विद्यार्थी मित्र प्रा रफीक शेख सरांचा लेख संग्रह संपादित ' करा स्मार्ट अभ्यास आणि मिळवा यश हमखास ' या विद्यार्थी सेवा समर्पीत भावनेनें तयार करण्यात आलेल्या या मोफत ब्लॉग पोर्टल वर मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार..!

Saturday, April 13, 2019

दहावीचा अभ्यास कसा करावा....?



दहावीचा अभ्यास कसा करावा....?

दहावीच्या  मुलांनी अभ्यास सुरु   केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर्वंचे ध्येय एकच असेल, परोक्षेत चांगले मार्क मिळावेत. अशी अपेक्षा तर पालकांची सुद्धा असेल.
   बघा परिक्षेत चांगले मार्क तर चांगले कॉलेज म्हणजे प्रवेश मिळणार, चांगले मित्र, मग चांगले संस्कार, मग पदवी परिक्षा पास होणार. चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार, स्वतःचे घर वगैरे होणार. मग जेव्हा आईवडिल लग्नासाठी मुलगी बघणार ती सुद्धा शिकलेली मिळणार, संसार सुखाचा होणार, आयुष्य मजेत, समाधानी होणार त्यातून आईवडिलांनासुद्धा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटणार. मग पालक म्हणणार आम्ही समाधानाने डोळे मिटायला मोकळे. हे सर्व घडणार एका दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले तर, मग फक्त आता दोनच महिने उरलेत अभ्यास करायला, मुलांने चला तर मग या शेवटच्या दोन महिन्यांचा पूर्ण उपयोग करून घेऊ यात.

१)   प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला बसा. जमल्यास एक कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो. सातपर्यंत पाठांतर करा, कारण ही वेळ पाठांतरासाठी चांगली. सातनंतर आंघोळ, नाष्टा करावा आणि पुन्हा साडेआठला बसावे, आता लिखाण करावे ते दहा वाजेपर्यंत. काय लिखाण करावे तर जे पाठांतर केले ते आठवते का पहावे. नंतर शाळेचे तयारी. सायंकाळी सहा वाजता शाळेतून आल्यावर प्रथम फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घ्यावे आणि पुन्हा  सात ते नऊ अभ्यासाला बसावे. आता मात्र मोठयाने वाचूनच अभ्यास करावा, ही वेळ मनन करण्याची नाही. कारणा बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही  म्हणून मोठयाने वाचून अभ्यास करावा. परत जेवण करून नऊ नंतर बसावे आणि धडे अथवा गाईड चाचून लिहीण्याचा सराव करावा.  हा अभ्यास अकरा वाजेपर्यंत करावा यात थोडाफार बदल करण्यास हरकत नाही. पाच ते सहा तास झोप पुरेसी होते. उगीचच रात्रभर जागू नये, त्याने प्रकृतीवर परिणाम होते, परिक्षा देण्यासाठी आरोग्य ठीक पाहिजे ना?


२)  आता ही वेळ आहे, सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याची. बाजारात नवनीतचे सराव प्रश्नपत्रिकेचे पुस्तक मिळते, ते आणून त्यातील प्रश्न पत्रिका सोडवाव्यात. पण कशा तर, पाचही सराव प्रश्नप्रत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवावा, म्हणजे बीजगणितातील पहिल्या प्रश्नात आठ प्रश्न असतात, तर ते आठच्याआठ मिळून चाळीस होतात, तर ते सर्व सोडवावेत, अशाप्रकारे दुसरा, तिसरा सर्व सोडवावेत. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा.


३)   भाषेच्या निबंधात विषय ठरवावा, आणि सतत संध्याकाळच्या वेळेस निबंध वाचावेत, पुन्हापुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. आता गणिताचा अभ्यास करताना, गणिते सोडवायला वेळ नाही, तर गाणिते फक्त वाचावीत आणि रीती समाजावून घ्याव्यात. सायन्सच्या आकृत्यांचा सराव करावा. पण हे सर्व संध्याकाळी सहा ते नऊ पर्यंतच करावे.

४)    एक मास्टर वही बनवावी त्यात गणिताची सूत्रे, सायन्स मधील सूत्रे, आकृत्या, महत्वाचे शब्द लिहून ठेवावेत म्हणजे ऐनवेळेस पुस्तकात शोधावे लागत नाही.

अभ्यासाच्या महत्वपूर्ण प्रमुख सात पाय-या ' दहावी आहे , आता अभ्यासाला लागायला हवं. ' असं सगळेचजण कानीकपाळी ओरडत असतात. पण अभ्यास नेमका कसा आणि कोणत्या पायऱ्यांनी करायचा ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच आम्ही आज देतोय , अभ्यासाच्या सात पायऱ्या. या पायऱ्यांवरुन चढत गेलात तर अभ्यास अगदी आनंदाचा होऊन जाईल.

एका शाळेत एक वाक्य  वाचलं होतं ,. त्यात म्हटलं होतं.
 "No good is too high if we climb with care and confidence. "

काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही. ‌

मित्र-मैत्रिणींनो , परीक्षेतलं यश या मानाने फारच लहानशी गोष्ट आहे. तुम्ही नीट अभ्यास करा , मार्क तुमच्याकडे आपोआप चालत येतील.

परीक्षेची भीती नकोच....

परीक्षेची भीती सोडली पाहिजे. भीती वाटणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे. ज्याच्याजवळ बळ आहे त्याला भीती वाटत नाही. ज्याचा अभ्यास व ज्ञानसंग्रह मोठा आहे. त्याला परीक्षेची भीती वाटत नाही. परीक्षेत यश किंवा अपयश मिळतं त्याला एक दिवसाचं कारण नसतं. सतत अभ्यास करणाऱ्याला यश मिळतं. दर दिवशी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा नापास होतो. दररोज तुम्ही नापास होत जाता म्हणून शाळांत परीक्षेत नापास होता. जो दररोज पास होत जातो तो शेवटच्या परीक्षेत सहज पास होतो. दररोज अभ्यास करणारा नापास होणं शक्य नाही. त्याला परीक्षेची भीतीही नसते.

अभ्यासाच्या पायऱ्या :

अनेक लोकांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतींचा विचार केल्यावर आपण अभ्यास कसा करावा याबाबतीत काही अनुभवाच्या गोष्टी पुढे दिल्या आहेत. त्याला आपण अभ्यासाची सप्तपदी म्हणूया.

उपस्थिती :

 ज्ञानग्रहणाचे स्थान प्रामुख्याने शाळा व क्लास महत्त्वाचं असतं. शिवाय वर्गात उपस्थित राहणंही अत्यंत महत्वाचं असते. शिक्षक विषय समजावून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत , अशा पद्धतीत विषय समजून देतात. तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्हीही प्रश्न विचारून आपलं समाधान करून घेऊ शकता , खरंतर तो विद्यार्थ्याचा हक्कच आहे. तुम्ही सबळ कारणांशिवाय तासांना गैरहजर राहिला तर मग ज्ञानही परीक्षेच्यावेळी गैरहजर राहतं. शंभर टक्के शाळा क्लासमध्ये उपस्थिती असणे ही उज्वल यशाची पहिली पायरी आहे.

श्रवण :

 वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं , डोळ्यांनी ते सर्व समजून घेणे व बुद्धीने ते ग्रहण करणं आवश्यक आहे. यालाच एकाग्रचित्ताने श्रवण करणं म्हणतात. ते तुम्ही किती टक्के करता त्यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे.

मनन- चिंतन :

जे पहिलं , ऐकलं , ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणं याला मनन म्हणतात. मन ही एक अशी कोठी आहे की , त्यात किती भरत गेले तरी ते पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती आहे की , ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते. नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. मनाची दुसरी एक अशी शक्ती आहे की ते सारख्या सारख्या विरोधी , जुन्या-नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते , त्याला चिंतन म्हणतात. जे पाहिलं , ऐकलं , वाचलं त्याचं असं सतत मनन-चिंतन सुरु ठेवावं. त्याला वेळकाळाचं बंधन नाही. मनात ही प्रक्रिया सतत चालू असते. नवीन ज्ञान प्राप्त झाले की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरु करावी.

वाचन-पाठांतर :

वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे. अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे , You hear you forget; you read, you remember ऐकलेले विसरु शकतो. वाचलेलं आठवतंच. वाचनाच्या अनेक पद्धती आहेत. मूक , मुखर , अर्थपूर्ण , हावभाव , स्वराधात , अर्थपूर्ण हावभाव करीत मोठ्याने (मुखर) वाचन करणे चांगले. चुका कमी होतात. इतरांना आनंद देता येतो. समजावून घेताना मूक- वाचन करावं. महत्त्वाच्या भागावर खुणा व्हाव्यात. उजळणी करताना किंवा नोट्स काढताना याचा फायदा होतो.
          महत्त्वाची वाक्यं , शब्द , म्हणी , सूत्रं , व्याख्या पाठच केल्या पाहिजेत. पाठांतर अतिशय महत्त्वाचं. पाठांतरसुद्धा सूत्रे , व्याख्या , कविता यांचं असावे , तर सारांश , उपयोग , कृती असे फक्त सुसंगत मुद्दे पाठ करावेत. शाळेत-वर्गात झालेला भाग पुन्हा पुन्हा वाचून पक्का होतो.

लेखन :

लेखनाने माणूस पक्का होतो. महत्त्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत. थोडक्यात नोट्स काढणं , सुसंगत लिहिणं ही कला आहे. पण ती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. अनेक मोठे लेखक आपले लिखाण दोन-तीन वेळा लिहितात व मग प्रसिद्ध करतात. सुवाच्य लिहिणं हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिले तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात असा अनुभव आहे. परीक्षा तर लेखीच होते. त्यामुळे लेखन भरपूर झालं पाहिजे. झालेलं लेखन तपासून , चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्सची परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत होते.

आविष्कार :

अभ्यास परिपूर्ण झाला की , त्याचा अविष्कार होत असतो. भांडं काठोकाठ भरलं की पाणी बाहेर वाहू लागतं. तसाच अभ्यास व्यवस्थित झाला , आत्मविश्वास आला की माणूस ते दुसऱ्याला सांगू लागतो. आविष्काराने ज्ञान वाढत राहते. इतरांना त्याचा फायदा होतो. मित्रांना मदत होते. संभाषण , नाट्यीकरण , वाद-विवाद स्पर्धा , कवितांच्या भेंड्या इत्यादी कार्यक्रमातून हा अविष्कार करावा. शिक्षकांच्या अनुपस्थितीत वेळ व्यर्थ जाणार नाही. मित्रांशी चर्चा करून त्यांचंही अभ्यासक्षेत्र विस्तारलं जाईल. नवीन नवीन कल्पना सुचतील व त्यामुळे आनंद निर्माण होईल.

सातत्य :

वरील सर्व पायऱ्यांचं सातत्य असावं. अभ्यास याचा अर्थच सातत्य असा आहे. ' दिसामाजी काहीतरी ते लिहावे. प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ' असं रामदासांनी म्हटलं आहे. जसं दररोज तुम्ही जेवता तसंच दररोज ज्ञानग्रहण केलं पाहिजे. विनोबांनी म्हटलंय की अन्न जसं पचवावं लागतं तसं ज्ञानसुद्धा क्षणाक्षणांनी व कणाकणांनी मिळवून पचवावं लागतं. दिवसाच्या चोवीस तासांचे ४ भाग करावे. ६ तास झोप , ६ तास व्यक्तिगत किंवा कौटुंबिक काम असा दिनक्रम आखून नियमित अभ्यास करावा. केवळ परीक्षेआधी १-२ महिने धडपड करून यशाची खात्री देता येत नाही. सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे.

फलश्रुती :

 वरीलप्रमाणे जो अभ्यासाची सप्तपदी आचरणात आणेल त्याला परीक्षेची भीती तर राहणार नाहीच. उलट तो परीक्षा अगदी सहज देईल शिवाय मार्कही चांगले मिळवू शकेल.

दहावी ही महत्वाची आहेच पण त्यासाठी टेन्शन घेऊ नका. शांतपणे अभ्यास केला तर सर्व सुरळीत होईल. एवढा अभ्यास कसा होईल? मला हे सर्व जमेल का? दिवस थोडेच राहिलेत, मग आता मी कसा अभ्यास करू? ह्या सर्व काळज्या आता सोडा. कारण काळजी करण्याची वेळ गेली आहे. उरलेल्या वेळेचा उपयोग करून घ्या. एकेक विषय पूर्ण करा. जसजसा अभ्यास पुढे जाईल तसतसी काळजी कमी होत जाईल. अवघड विषय कुठला आहे, त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा. सोपा विषय वेळेवर सुद्धा करता येतो, कारण तो सहज पार होतो.

किती सोपं असतं पहा. गणित जमत नाही ना? काल आम्ही सांगितल्या प्रमाणे गणिताचा अभ्यास करा, म्हणजे पाचही प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न सोडवायचा, जर तो बरोबर झाला तर झाले ना १० मार्क. आठ प्रमेय पाठ करा, दोन परिक्षेला येतात, झाले ना आठ मार्क. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ,  घनफळाची  फक्त सूत्रे पाठ करा, बघा कशी गणिते फटाफट सुटतात, याचे सहा मार्क मिळतात, मग झाले ना २४ मार्क. कशाला पाहिजे बाकी काय? अशा प्रकारे प्रश्न आणि मार्क निश्चित करा, आणि त्याच प्रमाणे अभ्यास करा, सर्व सोपे होऊन जाईल.

जिथे पुस्तके, वह्या ठेवता त्याठिकाणी नीट मांडणी करा. एका विषयाचे पुस्तक, त्याचे गाईड (असेल तर), वह्या, पुस्तिका वगैरे एकच ठिकाणी ठेवा म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करताना सर्व साहित्य एकाच वेळेस मिळेल, शोधायला वेळ जाणार नाही. आणि अभ्यास झाल्यावर ते सर्व साहित्य जागेवर ठेवल्याशिवाय दुसर्‍या विषयाला हात घालायचा नाही. एकापेक्षा जास्त मित्रांना सोबत घेऊन अभ्यासाला बसायचे नाही, त्याने मतांतरे होतात आणि अभ्यास होत नाही. शिवाय मित्रांची संवय होते आणि एकादा मित्र जर आला नाही तर अभ्यासाला मूड येत नाही. शिवाय गोंधळ जास्त होतो. सर्वात उत्तम आपण एकट्यानेच अभ्यास करणे.
      कारण आपणच आपले गुरू असतो.
आता पासूनच आहार हलका ठेवा.पचायला जड आहार नको. कारण आजारपण आल्यास नुकसान होईल. पोट सांभाळा. जागरण करू नका, त्याने पोट बिघडते मग सगळे वेळापत्रकच बिघडते. चिडचिड करू नका. आणि महत्वाचे वेळेवर आहार घ्या. अजिबात उन्हात फिरू नका.

दहावीचे वर्षभर आणि विशेषतः आता परीक्षा जशी जवळ येईल , तशी घरातील वडिलधारी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या असंख्य सूचनाही सुरू असतात. त्याचा राग येऊ लागतो आणि अशा त्रासिक मूडमध्ये अभ्यासात लक्ष लागत नाही ; पण वडिलधाऱ्यांच्या या वागण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा.

 आपली आई तिची सर्व कामे करूनही न दमता आपल्यासाठी कायम दिवस-रात्र उपलब्ध असते. आईने तिचा दिनक्रम आपल्या अभ्यासाच्या वेळेला पूरक बनवला आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळावे , यासाठीच तिची तळमळ आहे , असा विचार करा आणि प्रसन्न मनःस्थितीत शांतपणे अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल

सलग तीन-चार तास किंवा दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर तास-दीड तासाने
 आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करा. पहाटे लवकर किंवा रात्री जागून , यापैकी जे सोयीचे असेल , त्यानुसार वेळ ठरवा. पालकांनीही अभ्यासाच्या वेळेचा आग्रह धरू नये.

या काळात आहार संतुलित ठेवा. संतुलित म्हणजे सॅलड , कडधान्ये , सूप असेच काही नाही. रोजचेच जेवण ; पण जिभेसाठी जेवू नका. थोडक्यात , जेवल्यावर झोप येईल , असे चमचमीत पदार्थ , पक्वान्ने शक्यतो टाळा. वेळच्या वेळी ; पण मोजके आणि नेहमीचे जेवण करा. हॉटेलांतील अन्न शक्यतो टाळाच. विषय बदला.
          विषय बदलण्यापूर्वी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. त्यामध्ये आपल्या आवडीचे उदाहरणार्थ , गाणी ऐकणे , टीव्ही पाहणे , आई-वडिलांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे , कम्प्युटर गेम खेळणे असे काहीही करू शकाल. मात्र , हा ब्रेक दहाच मिनिटांचा असेल , याची काळजी घ्या.

पुन्हा अभ्यासाला बसताना सुरुवातीच्या पाच-सात मिनिटांत आधी तास-दीड तासात काय अभ्यास केला , याची उजळणी करून पाहा. त्यातील किती लक्षात राहिले आहे , याचा अंदाज घ्या आणि मगच नवीन विषयाची सुरुवात करा.

परीक्षेमध्ये जरी पाचपैकी कोणतेही चार सोडवा , असे ऑप्शन असले , तरी अभ्यास करताना कोणताही भाग ऑप्शनला टाकू नका. अभ्यास करताना जे जे अवघड वाटेल , ते ते शिक्षकांना विचारून शंका समाधान करून घ्या. अभ्यास करतानाच जर तुम्ही काही भाग ऑप्शनला टाकलात , तर हॉट्सचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. परीक्षेच्या वेळी , पाचपैकी कोणते चार अधिक चांगले येतात , ते पाहा आणि सोडवा.

                अभ्यासाला बसताना जेव्हा आपण ताजेतवाने असतो , तेव्हा आपला मेंदूसुद्धा अधिक तल्लख असतो. अशा वेळी म्हणजे थोडक्यात जेव्हा आपला अभ्यासाचा मूड असतो , तेव्हा सामान्यपणे आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यास आपण सुरुवात करतो. तसे न करता जेव्हा अभ्यासाचा मूड असेल , तेव्हा कठीण वाटणाऱ्या विषयाने किंवा न येणाऱ्या टॉपिकने अभ्यासाची सुरुवात करा ; कारण , बराच वेळ अभ्यास केल्यावर , कंटाळा आल्यावर आपण कठीण विषय अभ्यासाला घेतला , तर आपला मेंदू अधिक ताण घेण्याच्या परिस्थितीत नसतो. परिणामी , लगेचच झोप येऊ शकते.

          रोजच्या दिनक्रमाचं व अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. जे आपल्याला आचरणात आणता येईल , असंच वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ , सकाळी किती वाजता उठणार , हे ठरवताना पहाटे उठावं , या सूत्रानुसार ' पहाटे पाच वाजता उठावे ' असे ठरवूच नका. कारण भल्या सकाळी उठणं तुम्हाला जमणार नाही हे तुम्हाला माहितेय. ' सकाळी सात वाजता उठणार ,'

            हेसुद्धा वेळापत्रक असू शकते. फक्त नंतरचा वेळ नीट हुशारीने वापरा. दिवसभरात किमान आठ ते दहा तास अभ्यास होईल आणि आपल्याला सोयीचे वाटेल , असे वेळापत्रक बनवा. महत्त्वाचे म्हणजे , जे ठरवाल , ते कठोरपणे आचरणात आणा.


               परीक्षा म्हटल्यावर अनेक प्रश्न पडतातच. त्यातलेच काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं खास मुंटाच्या विद्यार्थी मित्रांसाठी...

       उत्तरपत्रिकेवर आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक कुठे लिहायचा असतो ? पुरवणीवरही पण तो लिहायचा असतो का ?

उत्तरपत्रिकेवर कुठेही आपलं नाव लिहायचं नसतं. पहिल्या पानावर एकाच ठिकाणी सही करायची असते. बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या ठराविक रकान्यातच , अंकांत आणि अक्षरांत लिहावयाचा असतो ; तसेच पुरवणीवरही ठराविक रकान्यातच बैठक क्रमांक लिहायचा असतो. इतर कोणत्याही ठिकाणी आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक चुकूनसुद्धा लिहू नका.

प्रश्नपत्रिकेवर बैठक क्रमांक लिहायचा का ?

प्रश्नपत्रिकेच्या वरील पानावर व प्रश्नपत्रिकेच्या आतील प्रत्येक पानाच्या उजव्या बाजूससुद्धा बैठक क्रमांक लिहायचा असतो.

पर्यवेक्षकाची सही कुठे असते ?
आपल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर आणि प्रत्येक पुरवणीवर पर्यवेक्षकाची सही आहे , याची खात्री करा.

उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूस समास सोडावा का ?

उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूस समास आखलेलाच असतो. त्यात केवळ प्रश्नक्रमांक व त्या खाली उपप्रश्न क्रमांक लिहावा. उत्तरपत्रिकेत आखलेल्या रेषा उजवीकडील बाजूस अगदी शेवटपर्यंत नसतात. साधारण उजवीकडील एक सेंटीमीटर जागा कोरी ठेवलेली असते. त्यात काही लिहू नका. वेगळा समास आखून जागा सोडण्याची आवश्यकता नाही.

पुरवण्या किती घेता येतात ? पुरवण्यांवर क्रमांक लिहावे का ?

- आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक तितक्या पुरवण्या घेता येतात , त्यास कोणतेही बंधन नाही. पुरवण्यांवर क्रमांक लिहिला , तरी चालेल. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर पुरवण्यांची संख्या लिहायची असते. पेपरच्या शेवटी करायचे हे काम असल्याने घाईमध्ये विसरू शकते. तसे न करता आठवणीने किती पुरवण्या जोडल्या , याचा आकडा न विसरता लिहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरवण्या क्रमाने बांधा.

उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजावा का ?

उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजला पाहिजे. केवळ ग्राफचा कागद जोडलेला असेल आणि एकही पुरवणी जोडली नसेल , तरी ग्राफच्या कागदासाठी एक पुरवणी अशी नोंद करा.

पेपर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाच्या शाईचं पेन वापरावं ?

पेपर लिहिण्यासाठी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचे पेन , बॉल पेन किंवा जेल पेन वापरावे. यापैकी ज्या रंगाचं पेन वापरण्याचं ठरवाल , त्या एकाच रंगाचं पेन वापरावं. दोन वेगवेगळ्या रंगांची पेन्स वापरू नयेत. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनशिवाय इतर कोणत्याही रंगाच्या शाईचा वापर केल्यास पेपर तपासला जात नाही व गुणही दिले जात नाहीत.

रफ वर्क म्हणजे कच्चं लिखाण करण्यासाठी वेगळे कागद मिळतात का ? 

नसल्यास कच्चे लिखाण कुठे करावं ?  

रफ वर्क करण्यासाठी सुटे वेगळे कागद मिळत नाहीत ; पण रफ वर्क प्रश्नपत्रिकेवर करू नका. रफ वर्क उत्तरपत्रिकेतच करायचं असतं. ते उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानांवर करावे. रफ वर्क पेनने करू नये ; ते पेन्सिलनेच करायचे असते. ज्या पानावर रफ वर्क कराल , त्या पानाच्या वर तसे नमूद करा.

उत्तरं लिहिताना एका खाली एक अशी लिहावीत का ? 

उत्तरपत्रिका पाठपोट २० पानांची असते. उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पाने असल्याची खात्री करून घ्या. उत्तरे लिहिताना प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. प्रश्नातील उपप्रश्नाचे उत्तर मात्र एका खाली एक त्याच पानावर लिहावे. उत्तर लिहिताना समासामध्ये प्रत्येक उपप्रश्नाचा क्रमांक नीट लिहावा. समासात प्रश्न किंवा उपप्रश्नाचा क्रमांक लिहिण्यासाठी वेगळ्या रंगाच्या शाईचे पेन वापरू नये.

अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ? पहाटे , दुपारी की रात्र ?

अभ्यास कोणत्या वेळी करावा , ते प्रत्येकानं ठरवावं आणि आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करावा. दुपारी अभ्यास होत नाही , तर संध्याकाळी करा , रात्री करा , पहाटे उठून करू शकता. पण दिवसभरात मिळून ८ ते १० तास अभ्यास होईल , हे पाहा.

मी जिंकणारच..!

परीक्षा अगदी जवळ आलीय , कितीही केला तरी अजून खूप अभ्यास बाकी आहे , या विचाराने मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे ; पण राहिलेल्या अभ्यासाचा मानसिक ताण घेऊन जर अभ्यास करत असाल , तर वेळही वाया जाईल आणि अभ्यासही होणार नाही. परीक्षा जवळ आल्याचा स्वाभाविक ताण असू द्या ; पण अनाठायी मानसिक ताण घेऊ नका. या उलट किती अभ्यास राहिलाय , किती झालाय याचा अंदाज घेऊन राहिलेल्या अभ्यासाचं व दिवसांचं नियोजन करा आणि माझा अभ्यास ठराविक वेळेत मी पूर्ण करणारच , या मानसिकतेत अभ्यास करायला बसा. ' मला जमणार आहे. मी चांगले मार्क मिळवणार आहे ,' असे सकारात्मक विचार मनात ठेवा म्हणजे मानसिक ताणाशिवाय चांगला अभ्यास होईल.

बऱ्याच वेळा अभ्यास करायला सुरुवात केली , की झोप येऊ लागते. याचे कारण तो विषय कंटाळवाणा नसून , आपला मेंदू थकलेला असतो , हे ध्यानात घ्या. आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही , तर मेंदू लवकर थकतो. त्यामुळे अभ्यास करताना झोप आली , तर थोडी हालचाल करा , उड्या मारा , थोडे चाला. एका जागेवर बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. व्यायाम करण्याने , चालण्याने , धावण्याने ; थोडक्यात हालचाल केल्याने मेंदू पुन्हा तरतरीत होतो.

परीक्षा जवळ येईल , तशी झोप कमी करून जागरणं करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आपण जेव्हा झोपतो , तेव्हा मेंदूला विश्रांती तर मिळतेच ; पण झोपेच्या काळात मेंदू दिवसभरात जमा केलेल्या ज्ञानाचे , माहितीचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण करत असतो. केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी हे आवश्यक असते.



1 comment:

🎓SSC-Activity -Sheets : For Practice

♦️ *SSC- Activity Sheet - March-2019* https://bit.ly/3Abk7nk ♦️ *SSC- Activity Sheet July -2019* https://bit.ly/3BXFycz ♦️ *SSC- Activity Sh...